भाईंदर: (प्रतिनिधी) सर्वत्र कोरोनाचे संकट असतांना
येथील अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ संचालित अभिनव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विना अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या ४ महिन्यापासून झाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ संस्थेच्या अंतर्गत वादामुळे आली आहे. पगार पत्रकावर फक्त प्राचार्य व संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील यांच्याच सह्या चालतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या या चेकवर सह्या झालेल्या असताना देखील संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील हे गेल्या चार महिन्यांपासून पगार पत्रकावर सह्या करण्यास चाल ढकल करत आहेत. संस्थेच्या अंतर्गत वादामुळे संस्थेत दोन गट पडले आहेत. परंतु, पगार पत्रकावर करण्यात येणाऱ्या सह्यांचे अधिकार मात्र मोहन पाटील यांच्याकडेच आहेत. या आधीही ३/३ महिन्यांचे पगार थांबले असतांना केवळ एक/दोन महिन्याचा पगार करत पुढे बघू असे म्हणत आले आहेत. आणि आता तर जवळपास ८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा ४ महिन्याचा पगार बाकी आहे. कर्मचाऱ्यांनी प्राचार्य यांना पगाराबद्दल विचारले असता त्यांनी पगाराच्या चेकवर सही केली आहे पण मोहन पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या समोर प्रत्यक्ष हजर करण्यास सांगत आहेत. प्राचार्य या संदर्भात आवश्यक ते हमीपत्र देण्यास तयार आहेत, पण मोहन पाटील प्रत्यक्ष हजेरीवर अडून बसले आहेत. परंतु सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेश असल्यामुळे शिक्षक व कर्मचारी बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. अशावेळी मोहन पाटील यांच्या या अडेलतट्टू धोरणामुळे सर्व शिक्षक व कर्मचारी हवालदिल झाले असल्याचे शिक्षक व कर्मचारी बोलत आहेत.
यासंदर्भात शिक्षक व कर्मचारी यांनी आपला थकीत पगार कोरोनाच्या कठिण वेळेत तरी मिळावा यासाठी पंतप्रधान यांचे कार्यालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, शिक्षक आमदार कपिल पाटील, कुलगुरू आदींना पत्र लिहून विनंती केली आहे.