कोरोनामुळे यंदा महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार घरीच - भन्ते करूणानंद थेरो


औरंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे यंदा महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती आंबेडकरी अनुयायी घरीच साजरी करणार असल्याची माहिती बौध्द धम्मगुरू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते करूणानंद थेरो यांनी दिली.


प्रत्येकवर्षी जगभरात खूप मोठ्या हर्षोल्हासात विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून सार्वजनिक स्वरूपात युगपुरुष डाॅ.बाबासाहेबांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याची परंपरा आहे.
परंतु यंदा कोरोना आजाराने थैमान घातले असल्याने कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार नसून व्हाट्सॲप, फेसबुक अशा सोशल मिडियाचा आधार घेवून घरात थांबूनच डाॅ.बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारीत, प्रज्ञाशोध परिक्षा, प्रश्नमंजूशा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, व्यक्तीमत्व विकास चाचणी, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला, इत्यादी उपक्रमाद्वारे बाबासाहेबांची जयंती साजरी होणार असून समन्वय समितीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान व मोफत आरोग्य तपासनी शिबीर घेण्यात येत आहे.
तसेच समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते करूणानंद थेरो यांच्या विपश्यना एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्यावतीने लाॅकडावूनमुळे हातावर पोट असलेले,पाल मांडून उघड्यावर राहून उदरनिर्वाह करणारे बेघर व अत्यंत गरीब नागरीक यांना घरपोच जिवनावश्यक सामानाची संपुर्ण किट दररोज दान देण्याचा उपक्रम देखील मुंबई आणि औरंगाबाद येथे राबवण्यात येत असल्याचे भन्तेंनी सांगितले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून समन्वय समितीचे सरचिटनिस नागसेन कांबळे यांनी आंबेडकरी अनुयायांना, कुणीही सार्वजनिक कार्यक्रम घेवू नये, गर्दी टाळावी, घराबाहेर पडू नये, स्वत:सह इतरांचीही काळजी घ्यावी, जयंतीच्या निमित्ताने समाजाची बदनामी होईल असे आपल्या हातून कोणतेही कृत्य घडणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी बाळगावी, कोणीही कायदा हातात घेवू नये अथवा कायद्याचे उल्लंघन करू नये, प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे, “कायद्याचे पालन करणे” हीच खरी जयंती ठरेल. असे आवाहन केले आहे.
कोरोनाने बऱ्याच ठिकाणी थैमान घातल्याने बाबासाहेबांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये भरीव मदत करण्याचा संकल्पसुध्दा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यंदांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व ठिकाणचे सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व गाव, तालुका व जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांवर महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख प्रतिनिधींकडून १४ एप्रिल रोजी सकाळी ०८:०० वाजता पुष्पहार अर्पण करून महामानवाचा यथोचित सम्मान करून जनतेला शासनाकडून रितसर शुभेच्छा देण्यात आल्या पाहिजे. अशी विनंतीपूर्वक मागणी समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते करूणानंद थेरो व सरचिटनिस नागसेन कांबळे यांनी केली आहे.