प्रज्ञावंत २०२० ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर, किरण किर्तीकर महाराष्ट्रातून प्रथम


ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोशियेशन ( BATA) व भीमबाणा यू ट्यूब चॅनल, मिरा भाईंदर (जि. ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "प्रज्ञावंत २०२०" परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्यांना अपेक्षित समाज घडण्यासाठी त्यांनी उभारलेल्या आंदोलन आणि साहित्याचा अभ्यास व्हावा , या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी विविध संस्था, संघटना संपूर्ण विश्वात साजरी करत असतात. या वर्षी "कोरोना"चे संकट संपूर्ण जगावराच आले आहे. तरी जागतिक नियमावलीचे भान ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी आपापल्या परीने गर्दी न करताही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखे उपक्रम राबवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोशियेशन (BATA) व भीम बाणा यू ट्यूब चॅनल यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय "प्रज्ञावंत २०२०" ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. बहुपर्यायी प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा, नावे लिहा, टीपा द्या व निबंध अशा प्रकारचे स्वरूप असलेल्या या परीक्षेत किरण संजय किर्तीकर, सातारा यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. तर विद्याधर हनुमंत पगारे, ठाणे व ऍड. बाबासाहेब सर्जेराव बनसोडे, मिरा- भाईंदर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ प्रणित अरुण सोनोने, यवतमाळ व सौरभ भगवान जाधव, कर्जत यांनी सुयश संपादन केले. यशस्वी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० रोख रक्कमेसह प्रमाणपत्र बाटाच्या वतीने व उत्तेजनार्थ २ बक्षीसे प्रत्येकी रु. ५०० रोख रक्कमेसह प्रमाणपत्र सूर्यकांत ढवळे, रोजच धम्म प्रसार युट्युब चॅनल च्या सौजन्याने तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या परीक्षेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुरेश गोतपागर यांनी काम पाहिले. तर स्पर्धेची पूर्वतयारी प्रा. उत्तम भगत, प्रा. भास्कर पैठणकर, प्रा. सुनील धापसे, प्रा. सचिन बंडे यांनी केली तर तांत्रीक काम किर्ती लाखण यांनी पाहिले.


ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी BATA चे प्रा. राजपाल तायडे, प्रा. अनिल धिमधिमे, सरोजिनी बडगे, तिलोत्तमा वाळके, प्रा. चंद्रकांत खुणे, प्रा. राजेंद्र व्हटकर, प्रा. शीतल खडक्कर - रसाळ, जयदीप बनसोडे, साहेबराव भिसे, प्रा. विश्वास खैरमोडे, प्रा. संजय जोशी, मच्छिंद्र खरात, सुदाम कांबळे, प्रा. मिलिंद भोंगळे, प्रा. जीवन धंदर, भिमराव काकडे, सिध्दार्थ इंगळे यांच्यासह सर्व BATA सभासदांचे सहकार्य लाभले.


सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या बक्षिसाची रक्कम व प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवण्यात येईल, असे BATA चे प्रा. भास्कर पैठणकर व भीमबाणा यू ट्यूब चॅनल चे प्रमुख राजेश जाधव यांनी माहिती दिली.