कोरोना योध्यांची निवासी व्यवस्था मुंबईतच करण्याची आमदार मनीषा कायंदे यांची मुंबई आयुक्तांना विनंती


मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर होत असून मुंबईत सर्वात जास्त रुग्ण असून या रुग्णांना सेवा पुरविणाऱ्या कोरोना योध्यांची निवासी व्यवस्था मुंबईत करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी बृहनमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त श्री प्रवीण परदेशी यांना विनंती पत्राद्वारे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे म्हणाल्या, "कोरोनाशी लढ़ा देणारे योद्धे म्हणजेच डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय , आयामावशी, पोलिस कर्मचारी, अत्यावश्यक सुविधा देणारे कर्मचारी मुंबईत काम करीत असले तरीही त्यांची निवासस्थाने ही ठाणे, कल्याण, बदलापूर , नवी मुंबई पनवेल ते थेट वसई विरारच्या पुढे आहेत, यातील अनेक कर्मचारी बेस्ट व एसटीमधून प्रवास करीत रोज मुंबईत येतात व दिवसभर काम केल्यानंतर ते मुंबईबाहेर आपआपल्या घरी जातात , यातील अनेक जण हे कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात येतात व नकळतच त्याना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते तसेच हे नागरिक परत आपल्या निवासस्थानी परतल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढते, हे टाळायचे असेल तर पुढील एक महिना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी म्हणजेच या कोरोना फ्रंटलाईन योध्यांची निवासी व्यवस्था मुंबईत त्यांच्या कामाच्या जवळच करणे गरजेचे आहे. मुंबईतील खाजगी हॉटेल्स, होस्टेल्स, लग्नाचे हॉल, शाळा व महाविद्यालये येथे त्यांची राहण्याची सोय केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल." असे मत व्यक्त केले आहे.