कोरोनाच्या अनुषंगाने मिरा भाईंदर महापौरांनी घेतली आढावा बैठक, लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचे निर्देश


भाईंदर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच 28 एप्रिल वरून आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन सक्तीचं वाढविण्याचे निर्देश मिरा भाईंदर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी मनपा आयुक्तांना दिले. 


वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, गटनेते, स्थानिक आमदार, मनपा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 
शहरातील खाजगी दवाखाने व रुग्णालय यामध्ये कोरोना कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार होत नसल्याचे निदर्शनात येत असल्याने कोरोना व्यतिरिक्त रुग्णांची गैरसोय होत असल्याने शहरातील डॉक्टर, दवाखान्यातील डॉक्टर व असोशिएशन याच्यासोबत ही बैठक घेण्यात आली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. 


कोरोना या आजारापासून संरक्षण करण्याकरिता केंद्र सरकारने मास्क व सॅनिटायझर माफक दरात उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक जारी केले असतांना सुद्धा शहरातील मेडिकल मध्ये बाजारभावापेक्षा जास्त किंमतीला विकत असल्याबाबत योग्य ती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. तसेच कोरोना रुग्णांवर शहरात प्लाझमा थेरेपीने उपचार करणारी यंत्रणा सुरु करण्यात यावी याबाबत ही निर्णय घेण्यात आला.