कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे मिरा भाईंदर मध्ये 3 मे पर्यंत संचारबंदीत वाढ, बेकरी दुकाने रात्री 2 ते सकाळी 4 पर्यँत सुरु - आयुक्त चंद्रकांत डांगे


भाईंदर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 100% आस्थापना बंद ठेऊन संचारबंदी जाहिर करणे अपेक्षित असताना काही आश्चर्यकारक निर्णय घेऊन संचारबंदी 28 एप्रिल वरून पुन्हा 3 मे 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी जाहिर केली. यापूर्वी दवाखाने, मेडिकल दुकाने  नियमाप्रमाणे सुरु होती व सकाळी 7 ते 11 पर्यंत दूध विक्री दुकाने सुरु होती तसेच जीवनावश्यक वस्तू सकाळी 9 ते सायंकाळ 5 पर्यंत घरपोच सेवा सुरु होती. त्याव्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरु नव्हती परंतु आता बेकरी दुकाने ही रात्री 2 ते सकाळी 4 पर्यँत सुरु राहणार आहे असा अजब निर्णय घेण्यात आला आहे. नागरीकांना आपल्या परीवारांची काळजी आहे. त्यामुळे सगळेजण समजूतदारपणाने वागत असताना बेकरी दुकाने रात्रीच्या वेळी सुरु ठेवण्याच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रात्रीची गर्दीही होण्याची शक्यता आहे. कारण या वेळी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन अधिकारी ही नसतील अशावेळी ही दुकाने सुरु राहिल्यास संचारबंदीचा फज्जा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रात्रीची वेळी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या अजब निर्णयामुळे नागरिकांची झोप उडाली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 


शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे पूर्णतः संचारबंदी वाढविण्याची वेळ आली असतांना नागरिक जबाबदारीने समस्यांना सामोरे जात असतांना बेकरी पदार्थ खरेदीसाठी मध्येरात्री 2 ते 4 वाजेपर्यंत जागण्याची वेळ या निर्णयाने नागरिकांवर आली आहे. चिकन, मटण, मासळी विक्री, अन्यधान्य विक्री दुकाने, मॉल्स, डीमार्ट, बिग बाजार इत्यादी अत्यावश्यक आस्थापने तसेच भाजी, फळ विक्री बाजार 28 एप्रिल रात्री 12 ते 3 मे रात्री 12 पर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी 9 ते सायंकाळ 5 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. दूध विक्री दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यत सुरु राहणार असून पिठाची गिरणी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आली आहे.